Maharashtra SSC Algebra Paper Leak in Aurangabad
शहरातील न्यू हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर शिक्षकांनीच दहावीच्या बीजगणिताचा पेपर फोडल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी संतोष दादासाहेब गायके, राजेंद्र चिंधा वाणी, अरुण भिकनराव सोनवणे आणि सचिन शिवाजी भामरे या शिक्षकांना अटक केली आहे. एस. पी. दाभाडे हा शिक्षक फरार आहे. दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाकडे याबाबत कोणतीही माहिती प्राप्त झालेली नव्हती.
इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेच्या गणित व रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न विचारण्यात आले होते. राज्य शिक्षण मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत रसायनशास्त्राचे ४ आणि गणिताचे ७ गुण असे ११ गुण विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.
■ दहावीच्या गणिताच्या पेपर फुटीची कोणतीही माहिती राज्य शिक्षण मंडळाकडे नव्हती. तसेच सोमवारी बारावीच्या वाणिज्य विषयाच्या बुक किपिंग अँण्ड अकौंटन्सी विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअँपच्या माध्यमातून ११ वाजून २६ मिनिटांनी फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांकडे फिर्याद देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याचे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या संदर्भात पेपर फुटीप्रकरणी विभागीय मंडळाकडून अहवाल मागविण्यात आला असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर बुधवारी यासंदभातील माहिती दिली जाईल, असे म्हमाणे यांनी सांगितले.
केंद्रप्रमुखच जबाबदार
■ हा प्रकार केंद्रात घडल्याने याची जबाबदारी केंद्रप्रमुखांचीच असते. आम्ही पंचनामा करून केंद्रप्रमुखांकडे दिला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी 'लोकमत'ला दिली.
पाथर्डीत शंभर रुपयांत पेपर
■ अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यात शंभर रुपयांत बीजगणिताच्या प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स मिळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. सोशल मीडियावरही एक प्रश्नपत्रिका फिरत होती. दुपारी उशिरा जिल्हा मुख्यालयात ही माहिती येऊन धडकली. शिक्षणाधिकारी ठुबे यांनी तातडीने पाथर्डीकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत परीक्षा संपलेली होती.
शिरपुरमध्ये दहावीचा पेपर दीड तास 'लेट'
■ धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये आर. सी. पटेल शाळा केंद्रावर दहावीच्या गणिताच्या पेपरला सेमी इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकांऐवजी मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका आल्यामुळे ऐनवेळी गोंधळ उडाला. त्यामुळे तब्बल दीड तास उशिराने दुपारी साडेबारा वाजता प्रश्नपत्रिका वाटण्यात आल्या.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net