Nagpur University Winter 2015 Exam Results
परीक्षा यंत्रणा सुपरफास्ट करण्याचा संकल्प कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी सहा महिन्यापूर्वी केला. यासाठी त्यांनी चार 'सुभेदार'देखील नेमले. परंतु हे 'सुभेदार' आणि तंत्रज्ञानाची मदत असूनदेखील निकाल लावण्यात विद्यापीठ प्रशासन फेल ठरले आहे. गतिमान प्रशासनाचा संकल्प ऑफलाईन झाला असला तरी तांत्रिकदृष्ट्या जाहीर झालेल्या निकालांची गुणपत्रिका बनविण्याची तसदीदेखील अधिकार्यांनी घेतलेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे अधिकारी विविध समारंभांमध्ये व्यस्त असताना नागपूर विभागातील ग्रामीण भागातील विद्यार्थी मात्र निकाल कधी लागणार यासाठी चातकासाठी आतुरतेने प्रतीक्षा करतो आहे.
जानेवारी महिना उलटून गेला असला तरी नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे निकाल अद्याप अर्धेदेखील जाहीर झालेले नाहीच. अनेक तयार निकाल तर फाईल्समध्येच अडकले आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे 'ऑनस्क्रीन' मूल्यांकनामुळे निकालांना वेग मिळेल, ही अपेक्षादेखील फोल ठरली आहे.
नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे सव्वादोनशेच्या जवळपास निकाल जाहीर झाले आहेत. अनेक परीक्षा होऊन तर ४५ दिवस कधीच उलटून गेले आहेत. तरीदेखील निकाल जाहीर होत नसल्याने विद्यार्थी चिंतातूर झाले आहेत. यासंदर्भात 'लोकमत'ने पडताळणी केली असता धक्कादायक बाब समोर आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक परीक्षांचे निकाल ९ जानेवारी रोजी तयार झाले आहेत. परंतु हे निकाल ना अद्याप संकेतस्थळावर ना जाहीर झालेत ना गुणपत्रिका छपाईसाठी गेल्या. हे निकाल गेल्या ३ आठवड्यांपासून केवळ फाईल्समध्येच आहेत. यासंदर्भातील 'टीआर रिपोर्ट'देखील परीक्षा भवनात तयार आहेत. तांत्रिकदृष्ट्या निकाल जाहीर झाला असून यांची गुणपत्रिका छपाईसाठी पाठविणे क्रमप्राप्त होते. परंतु अधिकार्यांनी याची तसदीच घेतली नसल्याची माहिती परीक्षा विभागातीलच सूत्रांनी दिली आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांनी कुणाकडे आशेने बघायचे हा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी यांच्याशी संपर्क साधला असता, सर्व काही सुरळीतच चालले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कुठल्याही निकालांची गुणपत्रिका अडकलेली नाही, असेदेखील त्यांनी सांगितले. परंतु प्रत्यक्षात ९ जानेवारी रोजी तांत्रिकदृष्ट्या जाहीर झालेल्या परीक्षांचे निकाल गुणपत्रिकेवर अद्याप उमटलेलेच नाही. या 'लेटलतिफी'मुळे परीक्षा विभागातील कर्मचारीदेखील हैराण झाले आहेत हे विशेष.(प्रतिनिधी) ३१ जानेवारीची 'डेडलाईन'देखील संपली
हिवाळी परीक्षांचे निकाल ३१ जानेवारीपर्यंत लागतील असा दावा परीक्षा विभागातील अधिकार्यांनी केला होता. आतापर्यंत सुमारे सव्वादोनशे निकाल लागल्याची माहिती अधिकार्यांकडून देण्यात येत आहे. परंतु नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर १८६ निकालच दाखविण्यात येत आहे. त्यामुळे अधिकार्यांपर्यंत निकाल लागल्याची माहिती तर पोहोचत आहे, परंतु प्रत्यक्षात गुणपत्रिका मात्र सर्वांच्याच तयार होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान निकालांची 'डेडलाईन' संपली असल्याने आता पुढे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्मचारीदेखील संतप्त
परीक्षा प्रणालीशी संबंधित काही अधिकार्यांमुळे यंदादेखील निकालांना उशीर होण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती खुद्द परीक्षा विभागातील कर्मचार्यांनीच दिली आहे. जे अधिकारी स्वत:चा अधिकार असलेले पूर्ण वेतन घेण्यासाठी शासनावर दबाव आणू शकत नाहीत, ते काय प्रशासनावर नियंत्रण ठेवणार अशी चर्चा परीक्षा भवनात रंगली आहे.
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net